श्री संत रविदास महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    ६५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

    नागपूर, दि. २७:- चर्मकार समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअनुषंगाने नागपूरनजीकच्या बाबुळखेडा परिसरात श्री संत रविदास महाराजांचे स्मारक व सभागृहाच्या बांधकामासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी अद्ययावत ई-लायब्ररीही सुरू करण्यात येईल. श्री संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कार्यक्रमांचे व्यापक आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले.

    महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात स्व. श्रीमती भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चर्मकार सेवा संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. आमदार कृष्णा खोपडे, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब बिघाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या ४९५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चर्मकार समाजातील नागरिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

    शिक्षणासोबतच तरुणांच्या रोजगारावर भर देताना मुख्यमंत्र्यांनी ‘लिडकॉम’ अर्थात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘बार्टी’ आणि ‘आर्टी’च्या धर्तीवर लिडकॉमची नव्याने बांधणी करून चर्मकार समाजातील मुलांसाठी प्रशिक्षण तसेच तत्सम सेवासुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

    शिक्षणानेच समाजाचा खरा विकास आणि शाश्वत प्रगती शक्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही केवळ औपचारिकता नसून काळाची गरज आहे. श्री संत रविदास महाराजांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

    कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात तरुणांना केवळ पारंपरिक पदव्यांवर अवलंबून न राहता कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करण्याचे आवाहन केले. चर्मोद्योग आणि पारंपरिक कलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः महिलांनी तयार केलेल्या हस्तकला आणि हातमाग उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

    उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा अशीच कायम ठेवून देशाच्या आणि समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    000000

    - Advertisement -