विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
- Advertisement -

विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू  – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई,दि.२७: शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

राज्यातील शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे निर्माण करणार का असा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी भरती प्रक्रिया करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते. या मुलाखत पॅनलमधील सदस्यांनी गुण द्यायचे असतात. यामध्ये संचालकाचा सहभाग ना हरकत देण्यापुरताच असतो. प्रत्येक पॅनलमधील दिलेल्या सदस्याचे गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात. विद्यापीठाने त्याला मान्यता द्यायची असती. मात्र तरीही शिक्षण विभागाप्रमाणे अथवा त्यापेक्षा सुधारित भरती प्रकिया करण्यासाठी सूचना आली आहे त्याच्यावर  उच्च व तंत्रशिक्षण विभाग नक्की विचार करेल असे उत्तर त्यांनी दिले.

0000

संध्या गरवारे, वि. स. अ. 

परभणी जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि.२७ : परभणी जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी लवकरात लवकर करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत विधानसभा सदस्य हरिष पिंपळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजी नगर यांचे मार्फत चौकशी सुरू आहे.

मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, परभणी जिल्हा बँकेतील झालेला गैरव्यवहार सिद्ध झाल्यास रिझर्व्ह बँकेला कळवून या बँकेची परवानगी रद्द केली जाईल. तसेच अनुकंपाच्या नावाखाली गैरप्रकार झाला असल्याच्या तक्रारी आहेत, त्याची देखील चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य प्रकाश साळुंके, विजय वडेट्टीवार, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.

00000

संध्या गरवारे, वि. स. अ.

नागपूर येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि. २७ : मौजा बेसा (नागपूर ग्रामीण) येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर या संस्थेच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

मौजा बेसा (नागपूर ग्रामीण) येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर या संस्थेच्या सार्वजनिक जागेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की,  संबंधित सहायक निबंधकांनी चौकशी करुन, चौकशी अहवाल, संस्थेचा खुलासा, अभिप्राय व निष्कर्षासह सादर केला आहे.

संस्थेने हस्तांतरित केलेल्या सात भूखंडांबाबत चाचणी लेखापरीक्षण करण्यात येईल व लेखापरीक्षण अहवालाअंती दोषी आढळून आल्यास सर्व संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

तसेच या गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या संबंधित सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल.

या चर्चेत विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार आणि प्रविण दटके यांनीही सहभाग घेतला.

00000

मोहिनी राणे/स.सं.

- Advertisement -