
मुंबई, दि. ७ : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दक्षिण सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने जे. जे. रुग्णालयाच्या फार्मसी विभागात तसेच संरक्षण मंत्रालय कक्षात विशेष ‘सायबर जनजागृती’ वर्गाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात सायबर सुरक्षेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक देसले आणि पोलीस कॉन्स्टेबल इम्रान मुलाणी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध
सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि बनावट सरकारी अधिकाऱ्यांच्या फोनबाबत मार्गदर्शन करताना, सरकारी यंत्रणा किंवा पोलीस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैशांची मागणी करत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
ओटीपी, पीन, सीव्हीव्ही, पासवर्डबाबत गोपनियता बाळगा
आर्थिक व्यवहार करताना ओटीपी, युपीआय आणि एटीएम पीन, सीव्हीव्ही, पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये, असे सांगण्यात आले. तसेच पैसे प्राप्त करण्यासाठी युपीआय पीन किंवा क्यूआर कोडची आवश्यकता नसते, याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
बनावट गुंतवणूक आणि पार्ट टाईम जॉबच्या आमिषापासून सावधान
बनावट शेअर गुंतवणूक, ट्रेडिंग योजना, पार्ट टाईम जॉबच्या आकर्षक ऑफर्स, बनावट लिंकस् आणि कस्टमर केअर क्रमांकांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत उपस्थितांना सावध करण्यात आले. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून एनी डेस्क, क्वीक सपोर्ट यासारखे रिमोट अक्सेस अप्स डाऊनलोड करू नयेत, असा सल्लाही देण्यात आला.
एआय आणि डीप फेकबाबतही जनजागृती
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार करण्यात येणारे फेक व्हॉईस आणि डीपफेक व्हीडिओ यांचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया अथवा अन्य डिजिटल माध्यमातून मिळालेली माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी टू स्टेप व्हेरीफिकेशन सुरू ठेवणे आणि प्रायमसी सेटिंग्ज योग्य पद्धतीने वापरणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क
सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न घालवता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक देसले यांनी केले.
0000
धोंडिराम अर्जुन/विसंअ

WhatsApp