
मुंबई, दि. १६ : ‘सर्वांसाठी अन्न आणि पोषण’ या संकल्पनेतून पोषण माह २०२६ निमित्त के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘पोषण रसोई स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबईतील घाटकोपर येथील अंगणवाडी सेविका प्रतिभा राहुल भालेराव आणि समुदायातील माता दीपाली संदीप तांबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी टीएचआर खिचडी, टीएचआर पराठा, शेवग्याच्या पानांची चटणी, मिश्र भाज्यांचा चाट आणि टीएचआर लाडू यांचा समावेश असलेली पौष्टिक थाळी सादर केली. त्यांच्या या अभिनव पाककृतीला परीक्षकांकडून गौरविण्यात आले. पालघरच्या यमुना सुरेश मिसाळ आणि प्रमिला सुभाष मिसाळ यांनी द्वितीय, तर गडचिरोलीच्या कविता रामू दुगा आणि पूजा रंजीत नारोटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
‘पहिले १,००० दिवस’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेत पालघर, नंदुरबार, गडचिरोली, कर्जत आणि मुंबई या पाच प्रकल्प क्षेत्रांतील सुमारे ३५० सहभागी १७५ संघांच्या माध्यमातून सहभागी झाले. अंगणवाडी केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराचा (टीएचआर) योग्य वापर करून कमी खर्चात, स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून पौष्टिक आणि चविष्ट पाककृती तयार करण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात ‘आयसीडीएस’ महाराष्ट्राच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, पोषणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. अनुराधा मित्रा आणि ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट शेफ राजेश शेट्टी यांचा समावेश होता.
स्पर्धेची पहिली फेरी सप्टेंबर २०२६ मध्ये पाचही प्रकल्प क्षेत्रांत आयोजित करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या आणि समुदायातील मातांनी सहभाग घेतला. सहभागी संघांनी टीएचआरचा वापर करून लाडू, पराठा, रवा वडी, लापशी, खिचडी, सुकडी आणि हलवा असे विविध पौष्टिक पदार्थ तयार केले. प्रत्येक पदार्थासाठी वापरलेले साहित्य, कृती आणि त्याचे पोषणमूल्य यांची माहिती सादर करण्यात आली. पदार्थांचे पोषणमूल्य, टीएचआरचा योग्य वापर, कुटुंबातील सदस्यांना स्वीकारार्हता, स्वच्छता, खर्च, घरगुती पातळीवर पुनर्निर्मितीची शक्यता आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षण करण्यात आले.
जिल्हास्तरीय फेरीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, धानोरा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी तसेच सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. या फेरीतील निवडक संघांना अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली.
स्पर्धेची अंतिम फेरी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे पार पडली. यामध्ये १४ संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघाला के हॉस्पिटॅलिटी कॉर्पमधील एका शेफची साथ देण्यात आली. संघांनी तयार केलेल्या पाककृतींचा मूळ पोषणमूल्यांचा उद्देश कायम ठेवून त्यांची चव आणि पौष्टिकता अधिक वाढविण्यासाठी शेफनी मार्गदर्शन केले. स्पर्धकांना पदार्थ तयार करण्यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला होता.
स्पर्धेतील सहभागी महिलांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून पूरक पोषण आहारातून विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याची क्षमता दाखवून दिली. अंगणवाडी सेविका आणि समुदायातील मातांना पोषणविषयक उपक्रमात सक्रिय सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वपूर्ण ठरली.
या उपक्रमातून तयार झालेल्या निवडक पाककृतींचे संकलन करून टीएचआर पाककृती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ही पुस्तिका अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, त्याद्वारे अंगणवाडी केंद्रे आणि कुटुंबांना या पाककृतींची पुनर्निर्मिती करता येईल. गर्भावस्थेपासून मातांच्या पोषणाची काळजी घेणे, पूरक पोषण आहाराचा नियमित वापर वाढविणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांना या उपक्रमातून चालना मिळणार आहे.
के हॉस्पिटॅलिटी कॉर्पची परोपकारी शाखा असलेल्या के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशनने या उपक्रमासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, ग्रामपंचायती आणि अरोहन, बायफ, बाल रक्षा भारत, सीएचआरआय, सीआरवाय, सीवायडीए आणि युनायटेड वे ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ

WhatsApp