
मुंबई, दि. ५ : स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विकसित केलेल्या नवीन ‘एसएफएस’ (सेल्फ फायनान्स्ड स्कूल्स) पोर्टलचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाले.
या पोर्टलमुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांना विविध सेवांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्जाच्या प्रक्रियेचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. अर्ज प्रक्रिया डिजिटल झाल्याने शासकीय कामकाज अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. पोर्टल विकसित करणाऱ्या पथकाचेही त्यांनी अभिनंदन केले. नवीन पोर्टलवर मंडळ संलग्नता ना-हरकत प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण, दोन सत्रांतील शाळेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शाळेचे स्थलांतर, शाळा व्यवस्थापनाचे हस्तांतरण, इयत्ता अकरावीसाठी अतिरिक्त तुकडी आणि अतिरिक्त शाखा सुरू करण्याची परवानगी, मंडळ बदल तसेच शाळेचे नाव व माध्यम बदलण्याची परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र संलग्नता रद्द करणे आणि प्रवेशक्षमता वाढविणे अशा एकूण १० सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करून शालेय गुणवत्तावाढीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री भुसे यांनी यानिमित्ताने केले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सर्व संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख ऑनलाइन उपस्थित होते.
०००००
बी.सी.झंवर/विसंअ

WhatsApp