
बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत असलेल्या खरीप पिकांना दिलासा देण्यासाठी पेनटाकळी धरणातील उपलब्ध शिल्लक पाणीसाठा सिंचनासाठी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. शेतकरी व लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यासंदर्भात पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पाणीवापर समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेली महावितरणची वीजजोडणी प्रक्रिया पूर्ण करून पाण्याअभावी सुकत असलेल्या खरीप पिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना समान न्याय देण्याच्या सूचना
पेनटाकळी धरणाच्या वरील बाजूस तसेच धरणाखालील भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांचा समतोल विचार करून पाणीवाटपाचे नियोजन करावे. पाणीवाटप करताना कोणत्याही भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या खरीप पिकांचे संरक्षण करणे आणि गरजेच्या वेळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या पेनटाकळी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
0000

WhatsApp