जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत – मंत्री प्रकाश आबिटकर

- Advertisement -


  • दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार

 अमरावती, दि. २४ (जिमाका) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 3 नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दुर्घटना घडलेल्या एनआयसीयूला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुलभा खोडके, महापौर श्री. चंद तेजवानी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आहे. यातून घटनेची भीषणता दिसून आली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दोन वर्षांपूर्वीच हे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथे संपूर्ण अद्ययावत सोयीसुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडायलाच नको होती. या घटनेचे नेमके कारण शोधून यापुढे अशी घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, एम्सचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. येत्या आठ दिवसात घटनेचा सखोल तपास करून प्रत्यक्ष जबाबदार असलेल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

ही समिती समस्येच्या खोलवर जाऊन कारणे शोधणार आहे. व्हेंटिलेटर, वीज यंत्रणेतील दोष, फायर ऑडिट, तसेच अन्य अनियमितता यांची सखोल तपासणी करेल. या दुर्दैवी घटनेतून यंत्रणेलाही शिकावे लागेल. ज्या त्रुट्या आढळून येतील त्या दुरुस्त करण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करेल. तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना शासनातर्फे पाच लाख रूपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच जखमी बालकांवर उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येईल. आजच्या घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट नियमानुसार व नियमीत होण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येईल. तसेच आवश्यक सूचना सर्व रुग्णालयांना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या दुर्घटनेतील नवजात बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

00000000



Source link

- Advertisement -