गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २४ : केंद्र शासनाने २०२९ पर्यंत नशामुक्त भारताचा संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रालाही नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमली पदार्थांविषयी जनजागृती महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून करण्यात येत आहे.

    मुंबई शहरातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा भाग म्हणून माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांसमोर भक्तगण, मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांना शासनाच्या योजना व उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.

    या उपक्रमात ‘नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र’, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याबाबत जनजागृती करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

    गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

    संस्थापक-अध्यक्ष असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या माझगावमधील अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या मंडळाचे सल्लागार सत्यम केसरकर, उपाध्यक्ष दशरथ पवार, कुंडलिक शिंदे, राजाराम कदम, खजिनदार अनिल शिंदे आदींनी नागरिकांना शासनाच्या ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या अनुषंगाने विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

    ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष राणे, कार्याध्यक्ष प्रसाद साटम, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक आणि खजिनदार संकेत आढरकर यांनी शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मंडळ सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

    लव्हलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिहीर मयेकर, उपाध्यक्ष गौरव धुरी आणि कार्याध्यक्ष साहिल मुरुडकर यांनीही ‘लोकसंवाद’ उपक्रमाला सहकार्य केले. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुबोध तोडणकर, उपाध्यक्ष हेमंत मयेकर, मेघा भोईर, उपसचिव मेघा चेंडवणकर यांना महिलांसाठीच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांची माहिती देऊन पात्र महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. घोडपदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तू थोरात, सल्लागार विजय शिंदे, जयेंद्र जाधव आदींनीही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

    भेसळ आढळल्यास त्वरित माहिती द्या

    विभागीय संपर्क अधिकारी किरण वाघ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अन्नातील भेसळीबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. अन्नामध्ये भेसळ आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

    ‘नशामुक्त मुंबई’साठी जनजागृती

    विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी अभियानाविषयी माहिती दिली. तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानातील सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद आवळे, उपनिरीक्षक सागर घाडगे, उपनिरीक्षक अस्लम मुजावर आणि त्यांच्या पथकाने अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. मुंबईसह महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता टोल फ्री क्रमांक १९३३ वर तसेच जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले.

    विभागीय संपर्क अधिकारी गजानन पाटील यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. सद्यस्थितीत एल निनोमुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

    ओबीसी विद्यार्थ्यांसाठी योजनांची माहिती

    विभागीय संपर्क अधिकारी धोंडिराम अर्जुन आणि इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर कार्यालयाचे विजय तोगरे यांच्या पथकाने इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, वसतिगृह आदी योजनांची माहिती नागरिकांना दिली. पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

    कौशल्य विकास विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी बेरोजगार युवक-युवतींसाठी राज्यभरात रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईतील १० ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून, विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गरजू युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

    गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या योजना, सेवा आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती देणारा ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रम नागरिकांसाठी माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.

    0000

    धोंडिराम अर्जुन/विसंअ

    - Advertisement -