जतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद – महासंवाद

    - Advertisement -

    सांगली, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगली आणि जत तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी जत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणेशभक्त, महिला व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिला सक्षमीकरण, सामाजिक समस्या तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

    तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी शिवनगर गणेशोत्सव मंडळ तसेच सुनेत्रा कॉलनी गणेशोत्सव मंडळास भेट दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती दिली.

    ‘लक्ष्मी मुक्ती’सह महिलांच्या सन्मानाशी संबंधित उपक्रमांची माहिती देताना तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, महिलांना कुटुंबाच्या मालमत्तेत योग्य हक्क व सहभाग मिळणे आवश्यक आहे. महिलांना मालमत्तेत सहभागीदार म्हणून समाविष्ट करण्यासाठी ‘लक्ष्मी मुक्ती’ योजना असून, या माध्यमातून महिलांच्या हक्कांचे संरक्षण होणार आहे. यामुळे कुटुंबातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होतील.

    महिलांच्या हक्कांसाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींची माहिती देताना तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, हुंडा प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध कायदेशीर उपाययोजनांबाबत महिलांनी जागरूक राहावे. आपल्या हक्कांबाबत सजग राहावे. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देताना महिलांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

    तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करताना मोबाईलवर प्राप्त होणारा OTP, बँक खात्याची माहिती, एटीएम/डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे तसेच संशयास्पद फोन किंवा संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे. फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

    शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आवश्यक अर्ज व प्रक्रिया पूर्ण करता येते. याबाबत नागरिकांनी संबंधित महसूल कार्यालयाकडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण आणि समान संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वही त्यांनी विषद केले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    या संवादावेळी सहाय्यक महसूल अधिकारी राहूल कोळी, ग्राम महसूल अधिकारी विलास सूर्यवंशी, महसूल सेवक सुभाष कोळी यांच्यासह सुनेत्रा कॉलनी गणेशोत्सव मंडळाचे प्रमोद संकपाळ, अमित कोळी, संभाजी कोडग तसेच शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे चंद्रकांत कुंभार, सुनील गिरी गोसावी, अनिल देशपांडे, अशोक स्वामी, नंदकुमार साळुंखे, सुरेश साळुंखे, प्रशांत साळुंखे, जगदीश हिरेमठ, प्रशांत हिरेमठ तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    00000

    - Advertisement -