
सातारा, दि.२३:- नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी विविध हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. महिला, बालके आणि इतर गरजू नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या संकटाच्या वेळी या क्रमांकांवर संपर्क साधून थेट मदत मिळवता येणार आहे, असे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण यांनी सांगितले.
देऊर ता. कोरेगाव येथील जय तुळजाभवानी गणेशोत्सव मंडळ व श्री जानुबाई गणेशोत्सव मंडळांमध्ये लोकसंवाद-२०२६ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षेचा प्रश्न विचारात घेता महिलांसाठी १८१ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी होणारा छळ, ॲसिड हल्ला, कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक किंवा शारीरिक त्रास, महिला आणि अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, शाळा अथवा महाविद्यालयांच्या परिसरात होणारी छेडछाड, सायबर गुन्हे, बलात्कार, जबरदस्तीने देहव्यापारात ढकलणे तसेच पळवून नेणे अशा विविध गंभीर घटना घडल्यास महिला या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधू शकतात. महिलांसंबंधी घडणाऱ्या इतर कोणत्याही अत्याचाराच्या घटनांमध्ये या हेल्पलाईनद्वारे तातडीने मदत पोहोचवली जाते, असेही श्री. हेमंतकुमार चव्हाण यांनी सांगितले.
तसेच, कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलिसांची मदत मिळवण्यासाठी ११२ हा पोलीस हेल्पलाईन क्रमांक २४ तास सेवेत आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी आणि रुग्णांना तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठी १०८ हा रुग्णवाहिका हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहे. याशिवाय, अडचणीत सापडलेल्या, शोषित किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांसाठी १०९८ हा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे. कायदेशीर सल्ला किंवा मोफत कायदेशीर मदतीची गरज असलेल्या नागरिकांसाठी १५१०० हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करून वेळेवर मदत मिळवावी, असे आवाहनही श्री. हेमंतकुमार चव्हाण यांनी केले.
००००

WhatsApp