जिल्ह्यातील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त भागांना पाठविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    - Advertisement -

    सिंधुदुर्ग, दि. १६ : जिल्ह्यात पशुधनासाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्यापैकी आवश्यक चाऱ्याची गरज पूर्ण करून उर्वरित चारा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पशुधनासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा व्यवस्थापनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

    जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात पशुधनासाठी सुमारे ३.८० लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील पशुधनाची गरज भागविण्यासाठी सुमारे दोन लाख मेट्रिक टन चारा आवश्यक त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अतिरिक्त चारा जाळून न टाकता त्याचा उपयोग इतर जिल्ह्यांतील पशुधनासाठी कसा करता येईल, याचा सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील चारा टंचाईग्रस्त भागांना सिंधुदुर्गातील अतिरिक्त चारा उपलब्ध करून देण्याच्या शक्यतेची तपासणी करावी. यासाठी राज्यस्तरावर समन्वय साधून चारा संकलन, साठवणूक, वाहतूक आणि वितरण याबाबत सर्वसमावेशक प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने उपलब्ध भाताच्या चाऱ्याची, गवताची इतर भागांतील जनावरांसाठी उपयुक्तता तपासणे आवश्यक आहे. जनावरे हा चारा कितपत स्वीकारतील, त्याची साठवणूक कशी करावी, वाहतुकीसाठी कोणती व्यवस्था आवश्यक आहे आणि चारा गरजू भागांपर्यंत वेळेत कसा पोहोचवता येईल, या तांत्रिक बाबींचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करावा. प्रशासनाने यासाठी पुढाकार घेऊन व्यवहार्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

    उपलब्ध चारा वाया जाणार नाही आणि त्याचा योग्य वापर होईल, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. या नियोजनाचा सविस्तर अहवाल आगामी मंत्रिमंडळ व उपसमितीच्या बैठकीत सादर करता येईल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

    या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत, पशुसंवर्धन उपायुक्त समीर बिलोलीकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ, अरविंद वनमोरे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष शिरोडकर, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक राहुल खंदारे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    ०००००

    - Advertisement -