
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती
• पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
नांदेड, दि. ४ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 54 हजार 910 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज 554 कोटी 84 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या लाभार्थ्यांसह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 57 हजार 128 पात्र शेतकऱ्यांना 1 हजार 416 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना प्रणालीवर नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण 2 लाख 24 हजार 847 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर 24 जुलै, 11 सप्टेंबर, 12 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या चार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 73 शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यापैकी 1 लाख 64 हजार 806 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. यापूर्वी 1 लाख 2 हजार 218 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 861 कोटी 56 लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर आज 4 नोव्हेंबर रोजी आणखी 54 हजार 910 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर 554 कोटी 84 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांपैकी एकूण 1 लाख 57 हजार 128 लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी तपासून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
तसेच या योजनेचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांनी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळत असून, त्यांना आगामी हंगामासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.
0000

WhatsApp