
- ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ‘महात्मा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष’ उपक्रमांचाही आढावा
मुंबई, दि. ४ : राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता जागा निश्चित झाली असून, उर्वरित सर्व जिल्ह्यांतील जागा निश्चितीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. वसतिगृहांच्या इमारती, खोल्यांची रचना आणि सुविधांसाठी चार पर्यायी आराखडे तयार करून संबंधित जिल्ह्यातील जागेच्या उपलब्धतेनुसार बांधकाम करावे, असे निर्देश ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, विभागाच्या संचालिका सोनाली मुळे तसेच नियोजन, नगर विकास, उच्च व तंत्र शिक्षण आणि दुग्धविकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाला वसतिगृहे आणि कार्यालयांच्या बांधकामासाठी एक रुपया नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा उपसमितीने आढावा घेतला. महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. उपसमितीने ‘महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी’ या विशेष बोधचिन्हाच्या संकल्पनेची निवड केली. महाज्योतीने दुष्काळ निवारणाशी संबंधित कार्यक्रम तयार करून समितीसमोर सादर करावा, तसेच महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याच्या प्रती छापून वितरणासाठी उपलब्ध कराव्यात, असे निर्देश उपसमितीने दिले. पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना उपसमितीने केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ नायगाव, महात्मा फुले यांचे जन्मस्थळ कटगुण, (जि. सातारा) आणि सत्यशोधक समाजाशी संबंधित स्थळांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक जतन-विकासाच्या कामांचाही उपसमितीने आढावा घेतला. पुणे येथील प्रस्तावित एकत्रित संकुलाच्या बांधकामासंदर्भात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सादरीकरणाबाबतही उपसमितीने चर्चा केली.
पुण्यातील फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी. राज्य संरक्षित फुलेवाड्यापासून सुमारे १५० मीटर अंतरावरील पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीतील सावित्रीबाई फुले स्मारकाला जोडणारा रस्ता विकसित करावा. तसेच फुलेवाड्याच्या परिसरातील आवश्यक जागांचे भूसंपादन करून स्मारक विस्ताराची कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अध्यासनांची स्थापना करावी. विद्यमान अध्यासनांवरील रिक्त पदे तातडीने भरून ती कार्यरत करावीत. विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह सीबीएसई, राज्य मंडळ व अन्य शिक्षण मंडळांच्या शालेय अभ्यासक्रमांत महात्मा फुले यांच्या साहित्याचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना उपसमितीने केल्या.
फुले दाम्पत्याचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी शासनाच्या वतीने परदेशातील विद्यापीठांमध्ये कार्यक्रम आयोजित करावेत. महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, फेलोशिप आणि शिष्यवृत्ती योजना राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी विशेष उपक्रम राबवणे, शाळा व महाविद्यालये व्याख्यानमाला, निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करणे. प्रत्येक शाळा ११ एप्रिल रोजी प्रभातफेरी, अभिवादन कार्यक्रम आणि विशेष व्याख्यान आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली.
०००००
किरण वाघ/विसंअ

WhatsApp