
सातारा दि. १९: सध्याच्या एल निनोच्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हाळा आणि पावसाळ्यातील कमी नगण्य पावसामुळे उष्ण हवामानात बाष्पीभवनाचा वेग वाढून ऊस पिकावर पाण्याचा मोठा ताण निर्माण होण्यास सुरवात होत आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा परिणाम ऊस पिकावर होऊन उत्पादनात १५ ते ५० टक्के संभाव्य घट होण्याची शक्यता आहे. ही उत्पादनातील घट टाळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन, पाचट व्यवस्थापन आणि शास्त्रोक्त खोडवा व्यवस्थापनाचा अवंलब करावा असे, आवाहन सातारा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांनी कसे करावे नियोजन व व्यवस्थापन?
सेंद्रिय मल्चिंग (पाचट आच्छादन) व पाचट कुजविण्याची शास्त्रोक्त पद्धत
- पाचट जाळू नका: ऊस तोडणीनंतर खोडवा ठेवायचा असल्यास शेतातील पाचट अजिबात जाळू नये किंवा शेताबाहेर काढू नये.
- पाचट कुट्टी: ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी मशीनच्या साहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करून ते शेतात एकसारखे पसरून घ्यावेत, जेणेकरून पाचट व्यवस्थापन सोपे जाते.
- जिवाणू संवर्धनाचा वापर: पाचट लवकर कुजण्यासाठी प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन ओलासर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे.
*पाचट आच्छादनाचे बहुमोल फायदे*
- पाण्याची बचत: पाचट आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व ओलावा जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते.
- सुपीकता व गांडूळ खत: जमिनीत नैसर्गिकरीत्या गांडुळांची व उपयुक्त जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून जमीन भुसभुशीत होते आणि जलधारणशक्ती वाढते.
- तण नियंत्रण: आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो, ज्यामुळे खुरपणीचा व तणनाशकांचा खर्च वाचतो.
- तापमान नियंत्रण व कर्बग्रहण: उन्हाळ्यात जमिनीचे तापमान थंड राहते. तसेच, सेंद्रिय पदार्थ कुजताना त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो, ज्यामुळे वनस्पतींच्या कर्बग्रहणाचा वेग वाढून उसाची जोमदार वाढ होते.
शास्त्रोक्त खोडवा व्यवस्थापन
- बुडखे छाटणी: उसाची तोडणी झाल्यानंतर उरलेले बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. यामुळे जमिनीखालील कोंब जोमदार फुटतात व फुटव्यांची संख्या वाढते.
- बुरशीनाशक फवारणी: बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच ०.१ टक्के कार्बेन्डॅझीम (१० ग्रॅम औषध १० लिटर पाण्यात मिसळून) या बुरशीनाशकाची फवारणी करावी, ज्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध होतो.
आपत्कालीन पाणी व्यवस्थापन
शक्यतो ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्यासाठी पाचट आच्छादनाचा वापर करून ‘सरी आड सरीतून’ पाणी द्यावे. या आधुनिक व शास्त्रोक्त तंत्राचा वापर करून शेतकरी बांधवांनी कमी खर्चात व कमी पाण्यात खोडव्याचे अधिक उत्पादन घ्यावे आणि आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी.
००००

WhatsApp