
मुंबई, दि. २३: प्रवासी वाहतूक क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावत प्रवाशांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करणाऱ्या ज्येष्ठ चालकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्या कार्यक्षेत्रातील वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ४३ पात्र सभासदांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात आला.
ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सन्मान निधीचे वितरण करण्यात आले. प्रवासी वाहतूक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा बजावणाऱ्या चालकांच्या योगदानाची दखल घेणे, त्यांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणाला हातभार लावणे आणि सेवाभावी कार्याचा गौरव करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रवासी वाहन चालकांना मंडळाचे सभासद होण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाने २० मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला आहे. त्यानुसार विविध प्रकारची प्रवासी वाहने चालविणाऱ्या पात्र बॅज व अनुज्ञप्तीधारक चालकांना मंडळाचे सभासदत्व घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा, टॅक्सी तसेच इतर पात्र प्रवासी वाहन चालकांनी मंडळाचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच मंडळामार्फत चालकांच्या कल्याणासाठी सन्मान निधी, जीवन व अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कौशल्यवृद्धी, कर्तव्य बजावताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य तसेच पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ज्या पात्र प्रवासी वाहन चालकांनी अद्याप मंडळाचे सभासदत्व घेतलेले नाही, त्यांनी www.ananddighekalynkarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. संकेतस्थळावर सभासद नोंदणीची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
संजय ओरके/विसंअ

WhatsApp