महाराष्ट्राच्या लोककला आणि श्रीगणेश भक्तीने लखनऊ दुमदुमले…. – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २३: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या सहकार्याने लखनऊ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत भव्य, प्रभावी आणि दर्जेदार सादरीकरण झाले. महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा, संगीत, नृत्य आणि श्रीगणेश भक्तीच्या विविध रंगछटांनी सजलेल्या या कार्यक्रमातून लखनऊच्या रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव मिळाला.

    राय उमनाथ बली प्रेक्षागृह, कैसरबाग, लखनऊ येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश विधान परिषदेचे आमदार पवन सिंह चौहान, भातखंडे संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. मांडवी सिंह, निखिलेश लखनवी, बिरजू महाराज कथक संस्थान, लखनऊच्या अध्यक्षा श्रीमती कुमकुम घर, उपाध्यक्षा श्रीमती निखिलेश तिवारी, उत्तर प्रदेश सांस्कृतिक विभागाचे माजी कार्यक्रम कार्यकारी अधिकारी कमलेश पाठक तसेच संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष अच्चेलाल सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांनी महाराष्ट्राच्या लोककलांचे उत्कृष्ट आणि प्रभावी सादरीकरणाची प्रशंसा केली आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड आशीष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

    लोककलांच्या विविध रंगछटांनी सजलेला मंच

    ‘लोककलेतील श्रीगणेश’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध पारंपरिक लोककलांचे अत्यंत सुंदर आणि प्रभावी सादरीकरण करण्यात आले. गणेशवंदना, नमन, ओवी, मंगळागौर, गोंधळ, बाल्या नृत्य, गौरी-गणपतीवरील हिंदी रचना व भजन, संगीतमय नृत्यनाट्य तसेच वाद्यवृंदाच्या साथीने सादर करण्यात आलेला श्रीगणेश नृत्यकलाविष्कार अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

    कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट नृत्य कलाविष्कारातून, अभिनयातून, पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा लखनऊच्या मंचावर जिवंत केली. यावर्षी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे देशाच्या विविध भागांत सादर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

    याच संकल्पनेतून ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे देशातील विविध राज्यांमध्ये सादरीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्राची ओळख केवळ त्याच्या इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवामुळेच नव्हे, तर त्याच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरांमुळेही आहे. महाराष्ट्राच्या या अमूल्य सांस्कृतिक वारशाची देशभरातील रसिकांना ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

    देशाच्या विविध भागांत राहणाऱ्या कला आणि संस्कृतीप्रेमींना महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव देण्याबरोबरच विविध राज्यांतील कलाकार आणि रसिक यांच्यात सांस्कृतिक संवाद व आदान-प्रदानाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे हस्तांतरण करण्याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशभर व्यापक स्वरूपात पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वय श्रीकृष्ण कला फाऊंडेशन यांनी केले. फाऊंडेशनच्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्ध परंपरा लखनऊच्या मंचावर प्रभावीपणे सादर केली.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लखनऊ येथील कमलेश पाठक, दुर्गेश पाठक आणि आशुतोष पाठक यांचे प्रत्यक्ष सहकार्य आणि महत्त्वपूर्ण योगदान लाभले. लखनऊच्या रसिक प्रेक्षकांनी ज्या आत्मीयतेने आणि उत्साहाने महाराष्ट्राच्या लोककलांचे स्वागत केले, त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक मैत्री आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला आणखी बळ मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.

    महाराष्ट्राची लोककला, श्रीगणेश भक्ती आणि लोकपरंपरेचा हा सांस्कृतिक जागर देशभर निरंतर पोहोचत राहावा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळावी, या भावनेतून ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम लखनऊ येथे अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

    ००००

    संजय ओरके/विसंअ

    - Advertisement -