
मुंबई, दि. २२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, महाआयटीने तयार केलेल्या योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर, आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, अशा एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आज एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
- या यादीमध्ये एकापेक्षा अधिक बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जथकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.
- या यादीतील राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जथकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
- योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी मृत, तसेच वयोवृद्ध आणि बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.
- आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात येणार आहे.
००००
काशिबाई थोरात/विसंअ

WhatsApp