
सांगली दि. ५ : जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या तात्काळ निविदा उघडून कार्यारंभ आदेश द्यावेत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानी खेळासाठी 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल खेळासाठी नॅचरल ग्रास मैदान या बाबी विकसीत करण्यासाठी पात्र निविदाकारास तात्काळ कार्यारंभ आदेश देण्याचे सूचित केले. तसेच जलतरण तलावाशी संबंधित आवश्यक दुरूस्तीची कामे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक फ्लोअरिंग तयार करणे, मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आवश्यक क्रीडा साहित्य खरेदी करणे आदी कामांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे मार्गी लावण्यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या दिल्या.
0000

WhatsApp