शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा – महासंवाद

    - Advertisement -

    नागपूर दिनांक ८: पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली

    दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा या गावाला मुक्काम केला होता. आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सोबत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

    लोहारी सावंगा येथून सकाळी सोनेगाव येथे येथील दिलीप सरोदे या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दुष्काळामुळे कापूस पिकांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. पावसाअभावी कापसाची वाढ झाली नाही तसेच कापसाची बोंड सुद्धा फुटली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत खचून न जाता शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

     दुष्काळामुळे शेती नष्ट झाली असतानाच वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास असल्यामुळे सौर कुंपण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी दिलीप सरोदे या शेतकऱ्यांनी केली.

    वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    कोहळीच्या शेतकऱ्यांना दिलासा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील बाबुराव काळे यांच्या शेताला भेट दिली तसेच कापूस व तुरीच्या पिकांची पाहणी केली. दीर्घ काळापासून पाऊस न पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांच्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना तातडीने पाच  हजार रुपयाची मदत दिली आहे उर्वरित मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. कुणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

    शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देताना ऍग्री स्टॅक ची नोंदणी आवश्यक आहे परंतु दुष्काळी परिस्थितीत या मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी ऐवजी ऑफलाइन नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.

    दुष्काळी परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार धान्य उपलब्ध होत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे शिधापत्रिका नाही अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने नोंदणी करून त्यांनाही लाभ देण्यात यावा अशी सूचना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

    शेतीच्या नुकसानी संदर्भातील पाहणी दौऱ्यात आमदार चरण सिंग ठाकूर, राजीव पोतदार यांचे सह शेतकरी सर्वश्री वसंतराव चापले, संदीप सरोदे, दिनेश दापले, सरपंच बिपीन चापले, नलिनी सतीश रेवतकर, मनोहर कुंभारे आदी शेतकरी तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी अधिकारी उपस्थित होते.

    00000

    - Advertisement -