मुंबई, दि. १७ : वेल्सचे राजकुमार विल्यम आणि राजकुमारी कॅथरिन यांनी आज वांद्रे रिक्लेमेशन गार्डन येथे ‘अर्थशॉट प्राईज २०२६’ च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची भेट घेतली. शाश्वतता, नागरी गतिशीलता आणि स्वच्छ पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. भूतानचे राजे वांगचुक आणि राणी जेत्सून यावेळी उपस्थित होते.
यावेळी राजकुमार विल्यम यांनी भारतातील दोन अंतिम स्पर्धकांपैकी एक असलेल्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीचे इलेक्ट्रिक तीनचाकी वाहन चालवून स्वच्छ नागरी वाहतुकीच्या भारतीय नवकल्पनेचा अनुभव घेतला. भारताच्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी आणि महिला हाउसिंग ट्रस्ट या दोन संस्थांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी स्वच्छ नागरी वाहतुकीला चालना देत असून, महिला हाउसिंग ट्रस्ट समुदायाच्या सहभागातून हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता वाढविणारे उपाय विकसित करीत आहे.
‘अर्थशॉट प्राइज’ पुरस्कार सोहळ्याचे यजमानपद भारत भूषवित आहे. अर्थशॉट प्राईजच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणीय नवकल्पनांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
०००००
बी.सी.झंवर/विसंअ

WhatsApp