पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    - Advertisement -

    • ऑनलाइन पोर्टलद्वारे करता येणार मराठीतून अर्ज

    मुंबई, दि. १८ : पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या २१ योजनांचा ऑनलाइन पोर्टलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महिन्यात शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन. रामस्वामी, सहआयुक्त तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.

    पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या, शेळी-मेंढी गटांचे वाटप, दुधाळ गायी-म्हशींचे संगोपन आणि कुक्कुटपालन यांसह विविध व्यवसायांसाठी या योजनांमधून निधी व शासनाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनांमुळे शेतकरी, बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    पशुसंवर्धन विभागाने महाआयटीच्या समन्वयातून ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. इच्छुक अर्जदारांना ‘महा आयडी’ तयार करून या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येईल. पोर्टलवर मराठीतूनही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. राज्य शासन नऊ योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ योजना आणि अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन योजनांसाठी निधी देण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी सांगितले.

    दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि चारा उत्पादनासाठी विविध प्रकल्प

    विभागाच्या वतीने यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, भज-क प्रवर्गासाठीच्या योजना, नऊ राज्यस्तरीय योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ योजना आणि अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या तीन योजनांचा समावेश आहे.

    राज्यस्तरीय योजनांमध्ये पाच दुधाळ गायी किंवा म्हशींचा प्रकल्प, ५० शेळ्या किंवा मेंढ्या व पाच नरांचा प्रकल्प, पाच हजार अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, तीन हजार ते पाच हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, आठवड्याला एक हजार अंडी उबविण्याची क्षमता असलेले यंत्र, पाच माद्या व एक नर यांचा वराहपालन गट, मुरघास संयंत्र आणि पशुसंवर्धन कर्जावरील व्याज सवलतीचा समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजनांमध्ये एक किंवा दोन दुधाळ जनावरांच्या गटाचे वाटप, पाच शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर तसेच दहा शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर अशा गटांचे वाटप, ५०० कुक्कुट पक्ष्यांचे वाटप, हायड्रोपोनिक चारा उत्पादन आणि मिनी टीएमआर उपकरणासाठी अनुदान आदी योजनांचा समावेश आहे.

    अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनांमध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, चराई यांचा समावेश आहे.

    ०००००

    किरण वाघ/विसंअ

     

    - Advertisement -