आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा – मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २३ : आरोग्यविषयक योजनांची आणि कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच त्यांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद (आयईसी) विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जनजागृती, लोकसहभाग आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणाला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहिती, शिक्षण व संवाद विभागाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन, येथे घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, आरोग्यविषयक जनजागृती करताना केवळ माहिती प्रसारित करण्याऐवजी नागरिकांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे हा संवादाचा केंद्रबिंदू असावा. आरोग्य मोहिमा, विविध आरोग्य दिन, सण-उत्सव तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे नियोजन करावे. या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि माध्यमांचा समन्वयाने सहभाग घेण्यात यावा.

    वार्षिक कार्यक्रमानुसार आयईसी उपक्रमांचे नियोजन करून कार्यक्रमनिहाय प्रमुखांकडून मंजूर झालेल्या उपक्रमांची माध्यमनिहाय प्रभावी अंमलबजावणी करावी. माहिती व जनसंपर्क विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच राज्यस्तरीय आयईसी अनुदानाच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून आवश्यक मान्यता घेऊन उपक्रम राबवावेत. जिल्हास्तरावरील आयईसी उपक्रम जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवून त्याचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

    आरोग्य मोहिमांसाठी आवश्यक असलेले माहिती व जनजागृती साहित्य कार्यक्रमाच्या उद्दिष्टानुसार तयार करून त्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे. जिल्हास्तरीय आयईसी उपक्रमांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देतानाच विविध आरोग्य कार्यक्रमांसाठी प्रभावी आणि लोकाभिमुख जनजागृती साहित्य निर्मितीवर भर द्यावा. महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेचे नियमित प्रकाशन तसेच आयईसी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

    वर्तणूक बदल संवाद (बीसीसी) अधिक प्रभावी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करून त्यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग मिळवावा. राज्यातील स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय सेवा योजना, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, रेल्वे आऊटरीच ब्युरो तसेच राष्ट्रीय छात्रसेना यांसारख्या विविध संस्थांशी समन्वय साधून आयईसी व बीसीसी उपक्रमांना व्यापक स्वरूप द्यावे, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

    पत्रकारांसाठी ‘आरोग्य दूत’, विद्यार्थ्यांसाठी ‘आरोग्य दूत’ तसेच जिल्हा व तालुकास्तरावर ‘आरोग्य दूत’ उपक्रम राबविण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. आरोग्यविषयक अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार, विद्यार्थी आणि स्थानिक पातळीवरील विविध घटकांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक (आयईसी) डॉ. भगवान पवार, सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    ००००

    गजानन पाटील/विसंअ

    - Advertisement -