
मुंबई, दि. २२ : गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने दिल्या आहेत. काळाचौकी येथे बालिकेच्या विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ८ पोलीस महानिरीक्षक कार्यालये आणि १२ पोलीस आयुक्तालयांतील अधिकाऱ्यांची अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेत ऑनलाइन सुनावणी नुकतीच घेण्यात आली. त्यादरम्यान त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या सुनावणीत आयोगाच्या सदस्यांसह संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित वातावरणासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन, गणेश मंडळे, बाल संरक्षण यंत्रणा व प्रसारमाध्यमांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन आयोगाने केले.
गर्दी होणाऱ्या गणेश मंडळांमध्ये विशेष बाल पोलीस, महिला पोलीस व दामिनी पथक तैनात करणे, सीसीटीव्ही व देखरेख व्यवस्था प्रभावी ठेवणे, तसेच ॲम्ब्युलन्स, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सावली व सुरक्षित प्रतीक्षास्थळांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उत्सवस्थळी बालकांचा भिक्षावृत्ती व बालमजुरीसाठी वापर होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबवून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच आगामी दुर्गोत्सव ‘बालस्नेही’ करण्यासाठी आतापासूनच पोलीस प्रशासन व मंडळांनी नियोजन करावे, असे निर्देशही देण्यात आले.
००००
श्रद्धा मेश्राम/विसंअ

WhatsApp