
मुंबई, दि. २९ : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर कार्यालयामार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी तसेच पात्र अर्जदारांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त धनंजय निकम, सदस्य सलिमा तडवी आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुनिता मते यांनी केले आहे.
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
प्रस्तावांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अथवा अन्य त्रुटी असल्यास संबंधित अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, मुंबई शहर, पंचशील एम-१, तळमजला, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मिकी रोड, माटुंगा, मुंबई-४०० ०१९ येथे संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी. तसेच, ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अद्याप समितीकडे अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.
0000
अश्विनी पुजारी/विसंअ

WhatsApp