राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर विभाग प्रथम – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ४ : राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदआणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांनी आयोजन केले होते. या स्पर्धेत कोल्हापूर विभागाने प्रथम, अमरावती विभागाने द्वितीय, तर मुंबई शहर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती मुंबई शहरच्या जिल्हा क्रिडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी पत्रकाद्वारे दिली.

    १४ वर्षांआतील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या आठ विभागांतील सुमारे १४० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर व शिवछत्रपती पुरस्कारार्थी संदीप आवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ उपस्थित होत्या. आस्था सिंग आणि प्रज्ञा खाडे यांनी क्रीडा ज्योत घेऊन मैदानात प्रवेश केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर खेळाडूंनी क्रीडा शपथ घेतली.

    राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १८ खेळाडूंची निवड

    या स्पर्धेच्या अनुषंगाने हरियाणा, दादरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांआतील मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. आठही विभागांतील सुमारे ४० खेळाडूंच्या निवड चाचणीतून १८ खेळाडूंची राज्य संघासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कोल्हापूरच्या अस्मिता यादव, प्रिया ज्योतीराम गोरुले, सई निवारण निकम आणि विभावरी उमेश पाटील; वाशिमच्या कीर्ती संजय पुजारी आणि निशा दत्तात्रय मुधाळे; ठाण्याच्या सिद्धी योगेश म्हात्रे; धाराशिवच्या मयूरी अतुल इंगळे; नाशिकच्या आरोही कृष्णा शिंदे; छत्रपती संभाजीनगरच्या माधवी बाळू गायकवाड आणि ज्योती दत्ता कोंडेवाल; तसेच पुण्याच्या आराध्या कृष्णकांत भोसले यांचा समावेश आहे.

    स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारार्थी तथा जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर सायली जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, क्रीडा कार्यकारी अधिकारी निलेश गराटे, सोनाली गराटे आणि प्रीती टेमघरे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

    - Advertisement -