
- चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या शाखेचे उद्घाटन
- श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांचे लोकार्पण
- कडूस-पानमंदवाडी येथील ५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प
- पोलीस मदत केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन
पुणे, दि. ४ : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाचे पाणी, दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. शेतकरी टिकला तरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल, या भूमिकेतून शासन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेचे उद्घाटन, श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कडूस-पानमंदवाडी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन, पोलीस मदत केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, नगराध्यक्ष मनीषा गोरे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण थिगळे, उपाध्यक्ष सचिन मांजरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभ वर्ग करण्यात आले असून, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी टिकला तर शेती टिकेल आणि शेती टिकली तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच शेतीसाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. चारा उपलब्धतेसाठीही सर्वांनी सहकार्य करावे.

सौर प्रकल्पामुळे १९ गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज
कडूस-पानमंदवाडी येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे १९ गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आणि खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मंजुरी दिली होती. त्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे समाधान आहे. दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरज कमी होईल. त्यामुळे बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीविताला असणारा धोकाही कमी होण्यास मदत होईल. वीजपुरवठ्यातील अडचणी कमी करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
खेड तालुक्याच्या विकासासाठी विशेष लक्ष
खेड तालुका औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या भागाच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी नेहमीच विशेष लक्ष दिले. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यावर त्यांचा भर होता. त्यांनी आखून दिलेल्या विकासाच्या मार्गावरून पुढे जात संपूर्ण खेड तालुक्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे.
चाकण परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर उन्नत मार्गाचा प्रकल्प मार्गी लावण्यावर शासनाचा भर आहे. चाकणपर्यंत मेट्रोची जोडणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या परिसरातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ते विकासालाही प्राधान्य दिले जात आहे.
चाकण हा मोठा औद्योगिक परिसर असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. मात्र, वाहतूक, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अनेक प्रश्न आहेत. चाकणकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजगुरुनगर सहकारी बँकेची २० शाखांपर्यंत मजल
सहकार ही महाराष्ट्राची मोठी ताकद असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम सहकारी संस्था करतात. सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून राजगुरुनगर सहकारी बँकेने विश्वास संपादन केला आहे. बँक शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असून सध्या बँकेच्या २० शाखांचे जाळे उभे राहिले आहे. बँकेच्या सुमारे २ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी, १ हजार २५० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण आणि सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने सुमारे २७ कोटी रुपयांचा नफा मिळवला असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेने डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करून ग्रामीण भागातील उद्योजक, महिला आणि तरुणांना आर्थिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
चक्रेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांचे लोकार्पण
श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील रस्ते, संरक्षक भिंती, काँक्रीटीकरण, स्ट्रीटलाईट आणि नऊ मीटर उंचीचे हायमास्ट दिवे अशा विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. साळुंके वस्ती ते चक्रेश्वर मंदिर रस्त्याचे काँक्रीटीकरण, मंदिर परिसरातील संरक्षक भिंत आणि मंदिर रस्त्यापासून कमानीपर्यंत काँक्रीट रस्ता यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंजवडी मेट्रोसह रस्ते विकासाला गती
हिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यामुळे हिंजवडी आयटी क्षेत्रासह परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील विविध रस्त्यांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम सुरू असून, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांचाही दर्जा सुधारण्यास याचा लाभ होणार आहे. त्यामुळे दळणवळण, पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल.
अजित पवार यांनी पाहिलेले विकसित, सक्षम आणि आधुनिक खेड तालुक्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विकासकामे मंजूर होणे महत्त्वाचे असले तरी ती वेळेत पूर्ण होऊन त्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी- कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0000

WhatsApp